हे डाळिंबाचे दाणे वेड्या घात तुझा करिती ॥ ध्रु० ॥
कवटी तूं कवठावरली फोडिलीस एका काळीं ती चोंच आज बोथटली
करितोस गुजारा धनी टाकितो त्या तुकड्यांवरती ॥ १ ॥
मालक तव हौशी फार करि माया जरि अनिवार कुरवाळी वारंवार तूं पाळिंव पोपट त्याचा म्हणुनी तुच्छ तुला गणिती ॥ २॥
चैनीत घेत गिरक्यांसी स्वच्छंदें वनि फिरलासी गगनांत स्वैर उडलासी ते स्वातंत्र्याचे दिन सोन्याचे आठव तू चित्तीं ॥ ३ ॥
चाहिल ते झाड बाघावें त्यावरी स्वैर उतरावें फळ दिसेल ते फोडावें मग उडुनी जावें खुशाल असली तेव्हांची रीती ॥ ४ ॥
कितितरी फळे पाडाची चोचीनें फोडायाचीं हि लीला तव नित्याची पिंजऱ्यात अडकुनि आयुष्याची झाली तव
माती ॥ ५ ॥
पूर्वीची हिंमत गेली स्वत्वाची ओळख नुरली नादान वृत्ति तव झाली
करितोस धन्याची 'हांजी हांजी' तूं पोटासाठीं ॥ ६ ॥
येतांच धनी नाचायें नाचत त्या सत्कारावें तो वदेल तें बोलावें
तेव्हांच टाकितो मालक दाणे असले
तुजपुढतीं ॥ ७ ॥
हे दाणे दिसती छान जरि लाल आणि रसपूर्ण त्याज्य ते विषासम जाण
पिंजयात मिळती म्हणुनि तयांची मुळिं नाही
महती ॥ ८ ॥
हा अध:पात तव झाला डाळिंबच कारण याला
भुलुनिया अशा तुकड्याला
पिंजयांत मेले किती अभागी पोपट या
जगतीं ॥ ९ ॥
- काव्यविहारी (धोंडो वासुदेव गद्रे)
No comments:
Post a Comment