StatCounter

Sunday, September 10, 2023

आई असते श्रावण

 

आई असते श्रावण अविरत रिमझिणारा
तप्त जिवाची तगमग सारी थांबविणारा

ऊन व्यथांचे चहूबाजूंनी रणरणता आला
आई बनते वृक्ष सावली अंथरणारा

रडून जेंव्हा जेंव्हा माझे डोळे थकले
कानी आला शब्द तिचा मन शांतवणारा

आईविण या जगात साऱ्या दुसरा नाही
माझ्यावरती हृदयच अपुले पांघरणारा

आई म्हणजे काय मला इतकेच उमगले
एक दिवा जळणारा आणिक तळमळणारा

- दिलीप पांढरपट्टे

No comments:

Post a Comment